दोन मराठी उद्योजक भावांच्या 'क्विकहील'ची कहाणी!

दोन मराठी उद्योजक भावांच्या 'क्विकहील'ची कहाणी!


रेडिओ आणि कॅल्क्युलेटर दुरुस्ती करण्यापासून ते ग्लोबल सॉफ्टवेअर बिझनेस चालवणाऱ्या दोन मराठी उद्योजक भावांनी त्यांच्या बिझनेसमधून आज ३५० कोटींचा टप्पा पार केला आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या मराठी भावंडांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कैलाश काटकर आणि संजय काटकर या भावांनी आज 'क्विकहील टेक्नॉलॉजिस'ला जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवले आहे.

10X MBA Online ॲप डाऊनलोड करा

कैलाश व संजय काटकर हे महाराष्ट्रातील एका छोट्याश्या गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले. काही काळानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तेथे त्यांच्या वडिलांनी मशीन सेटर म्हणून फिलिप्समध्ये काम करायला सुरुवात केली. दहावी नंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि वडिलांना त्यांच्या रेडिओ रिपेअरिंगच्या कामात मदत करू लागले. हळूहळू त्यांना या कामात गती आली आणि या कामाची गोडीही वाटू लागली. तीन महिन्यातच त्यांना रिपेअरमन म्हणून महिना ४०० रुपये मिळकतीवर काम मिळाले. पण कैलाश तेवढ्यावरच थांबले नाही. बँकेत कॅल्क्युलेटर रिपेअरिंगला जात असताना तेथे काचेत ठेवलेला कम्प्युटर बघून काही काळात कॅल्क्युलेटरची जागा कम्प्युटर घेणार असल्याचे त्यांने अचूक हेरले.. कम्प्युटरचे जग येत असताना बघून त्यांनी कॅल्क्युलेटर सोबतच काम्पुटर रिपेअरिंग सुद्धा शिकून घेतले.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


या दरम्यान संजय यांनी सुद्धा आपल्या भावाचा इलेक्ट्रॉनिक्स मधील रस बघून त्यांना हातभार लावण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग घेण्याचे ठरवले. पण कैलाश यांनी संजयला कम्प्युटर सॉफ्टवेअरचे शिक्षण घेण्यास सांगितले. त्यावेळी कम्प्युटर सॉफ्टवेअर शिकण्याची फी ५ हजार होती, आणि सामान्य कुटुंबाला परवडण्यासारखी नव्हती. पण कैलाश यांनी त्यांच्या वाढत्या पगारातून संजयच्या शिक्षणाचा प्रश्न तर सोडवलाच शिवाय मंगळवार पेठेत स्वतःचे एक छोटे दुकान सुद्धा टाकले. काही दिवसांनी त्या दुकानात बिलिंग साठी ५० हजार किमतीचा कम्प्युटर सुद्धा त्यांनी घेतला. इकडे शिक्षणाच्या दरम्यान संजय यांची पहिल्यांदा व्हायरस या गोष्टीशी सामना झाला. बर्‍याच वेळा प्रॅक्टिकलच्या वेळी कॉम्प्युटर व्हायरसमुळे बंद असायचे. यातूनच संजय यांनी व्हायरस विषयी त्यांनी अभ्यास सुरू केला.
 

व्हायरसवर उपाययोजना तसेच वेगवेगळे टूल्स त्यांनी लिहिले ज्यामुळे तेव्हाच्या व्हायरसशी सामना करण्याचे सोल्यूशन मिळाले. पुढे हेच टूल्स अँटी व्हायरस म्हणून स्वतःचे प्रॉडक्ट बनवून विकण्याची उद्योजकीय कल्पना कैलाश यांना आली. त्यांनी संजयला ही कल्पना सांगितली आणि त्यांच्या उद्योजकाच्या प्रवासाला सुरुवात झाली.


१९९५ मध्ये चाळीतील एका छोट्या खोलीतून कैलास यांचे कॉम्प्युटर दुरुस्तीचे काम आणि संजय यांचे अँटी व्हायरस तयार करण्याचे काम सुरू होते. कॉम्प्युटर दुरुस्तीच्या कामात चांगलाच जम बसला होता. त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर खर्च भागत होते. हार्डवेअरचे पार्ट्स लोक विकत घ्यायचे परंतु सॉफ्टवेअर विकत घेणे त्या काळी प्रचलितच नव्हते. शिवाय त्यावेळी इतर मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा बाजारात होत्या आणि त्यांचा सामना करणे या बंधूंना कठीण जात होते. कंपनीने १९९८मध्ये www.quickheal.com नावाची स्वतःची वेबसाइट सुरू केली. सुरुवातीला कॅट कम्प्युटर सर्व्हिसेस (CAT Computer Services) असणाऱ्या त्यांच्या कंपनीचे कालांतराने २००७ साली ‘क्विक हील टेक्नॉलॉजिस लिमिटेड’ असे नामकरण झाले. त्यावेळी संजयने ग्राहकांच्या नवनवीन मागणीचा अभ्यास करायला सुरुवात केली. सोबतच कैलाश हे त्यांचे अँटी व्हायरस विकण्यासाठी स्वतः बाजारात उतरले. त्यांच्या बोलण्याच्या प्रभावी शैलीमुळे आणि अनुभवामुळे त्यांना चांगलाच फायदा झाला.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


 दोघे भावंडांच्या मेहनतीमुळे बिझनेस वाढत गेला. विस्तारत जाणार्‍या कामासाठी त्यांनी त्यांच्या उद्योगाला कॉर्पोरेट लुक दिला. सोबतच काही लोकांना जोडीला घेऊन एक चांगली टीम तयार केली. पण फक्त पुण्यात राहून त्यांना इतर शहरांमध्ये सेवा देता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी इतर अनेक शहरांमध्ये क्विकहीलची छोटी छोटी कार्यालये सुरु केली. क्विकहीलचा बिझनेस दिवसेंदिवस वाढत होता. सर्व छोट्या शहरांना लक्ष्य केल्याचा त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये खूप मोठा फायदा झाला. सर्वात शेवटी त्यांनी मुंबईकडे मोर्चा वळवला आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर क्विकहीलचा विस्तार झाला आहे. आज संपूर्ण भारतभर क्विकहीलच्या ३३ हून अधिक शाखा आहेत आणि जगभरातून ८० शहरांमध्ये ‘क्वीक हील’चे ग्राहक आहेत.