या गोष्टी केल्यास प्रत्येक दिवस तुमचा!

या गोष्टी केल्यास प्रत्येक दिवस तुमचा!


'दिवसाची सुरुवात खराब झाली, म्हणजे पूर्ण दिवस खराब जाणार'. 'कितीही प्रयत्न केला तरी  आपल्याबाबतीतच सर्व वाईट गोष्टी होतात.'  असे नकारात्मक विचार अनेकांना सतावत असतील. हे लोक सतत स्वतःला दोष देत राहतात किंवा एकूणच परिस्थिती आपल्यासाठी  अनुकूल नाही असे मानतात. आपले कोणतेही काम व्यवस्थित पार पडत नाही.  कुठल्याही गोष्टीत आपलयाला अपेक्षित यश मिळतच नाही या विचारातून हे लोक हताश होतात. बहुतेक वेळा अपयश येण्याआधीच हे लोक मैदान सोडून देतात.  त्यामुळे साहजिकच प्रत्येक कामात काहीतरी खोडा येऊन अशा लोकांची कामे रखडतात. सतत नकारात्मक विचार केल्याने या लोकांची मानसिकता नकारात्मक होऊन जाते.


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


    कुठल्याही नव्या कामाची सुरूवात हे लोक प्रश्नचिन्हाने करतात. म्हणून आत्मविश्वासाने त्यांना ध्येय गाठण्यात अडचणी येतात. यासाठी कोणतेही काम करताना सकारात्मक मानसिकता ठेवणे अत्यंत गरजेचे असते. महत्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब,  नैराश्य, आणि तणावासंबंधी इतर विकार उद्भवण्याचा धोका कमी होतो. कुठल्याही गोष्टीबाबत सकारत्मक दृष्टिकोन ठेवल्याने सकारात्मक मानसिकता तयार होते. सकारत्मक दृष्टिकोन वाढण्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे.

दिवसाची सुरुवात होकाराने

तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता, यावर तुमचा दिवस कसा जाणार हे ठरते. सकाळी उठल्यावर अंगात आळस असणे, आज काही काम करण्याचा मूड नाही, असे विचार मनात येणे. यामुळे तुमचा पूर्ण दिवस सुस्तीत जातो. काम करण्याचा उत्साह नसल्यामुळे तुमचे कामात लक्ष लागत नाही,  अपेक्षित परिणाम साधता येत नाही. आणि आपले काम का व्यवस्थित होत नाही याबाबत चिंतीत होऊन  तुम्ही स्वतःला दोष देत राहतात. म्हणून दिवसाची सुरुवात करतानाच आज आपला दिवस चांगला जाणार असल्याचा विचार मनाशी करून ठेवा.


चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या

दैनंदिन जीवनात तुम्हाला अडचणी येणारच.  तुमचे सगळेच दिवस चांगले असूच शकत नाही. म्हणून अशा कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास त्यातील चांगल्या  गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ समजा तुम्ही वाहतूककोंडीत अडकलात तर आवडीची गाणी ऐकायला किंवा रेडिओवर बातम्या ऐकायला आयताच वेळ मिळाला आहे असे समजा. म्हणजे वाहतूककोंडी सुटेपर्यंतचा पूर्ण  वेळ तुम्हाला मनस्ताप होणार नाही.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


प्रतिकूल परिस्थितीतही विनोदबुद्धी ठेवा

प्रतिकूल परिस्थितीत देखील तुमची विनोदबुद्धी राखून ठेवा. यामुळे तुमच्या मनावरील ताण कमी होतो. उद्या ह्याच घटना आठवून तुम्हाला हसायला येईल. किंवा मित्रांसोबत गप्पा रंगल्यावर किस्सा म्हणून सांगता येतील. 'अरे तुला माहिती आहे का माझा दिवस काय वाईट गेला? किंवा तुला विश्वासच बसणार आहे की, आज मला काय कराव लागलं' अशी सुरुवात करून हे अनुभव सांगू शकाल. चांगली विनोदबुद्धी असणे किंवा प्रतिकूल परिस्थितीतही कायम संयम राखणे हे अतिशय सक्षम मानसिकतेचे प्रतीक आहे.


चुकांमधून शिका

जगात कोणीच परिपूर्ण नाही. म्हणून तुमच्याकडून कधीनाकधी चुका या होणारच. या चुकांकडे तुम्ही कसे पाहता हे जास्त महत्वाचे आहे. या चुकांकडे दुर्लक्ष केले किंवा माझ्यासोबत असेच होते, असा विचार केल्यास हे चुकांचे सत्र कधीच संपणार नाही. म्हणून तुम्ही का चुकलात हे पडताळून पहा. पुढच्या वेळी ते काम करताना तुम्ही काय वेगळे करणार याचा विचार करा. तुमच्या चुकांमधून धडा घ्या.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


सकारात्मक लोकांसोबत राहा

जेव्हा तुम्ही सकारात्मक लोकांसोबत राहता, त्यांच्या सकारात्मक विधायक गोष्टी ऐकता, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो. आणि तुम्हीदेखील अधिक सकारात्मकतेने कोणतेही काम करता. अशा प्रकारचे सकारात्मक लोक मिळणे कठीण आहे. मात्र जे लोक सारखे तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव करून देतात. सतत वाईट बोलतात अशा लोकांचा सहवास टाळा. त्याचप्रमाणे तुम्ही देखील जास्तीतजास्त सकारात्मक गोष्टीबाबत चर्चा करा. ज्यामुळे इतरांनाही तुमच्याकडून प्रेरणा मिळेल.

या काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात लक्षात ठेवल्यास तुम्हाला सकारत्मक मानसिकता विकसित करण्यास मदत होईल.  आणि व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात यशाची उत्तुंग शिखरे तुम्ही गाठू  शकाल.