स्वतःला ओळखण्यासाठी हे नक्की करा...

स्वतःला ओळखण्यासाठी हे नक्की करा...

आज स्पर्धेच्या जगात प्रत्येकालाच पुढे जायचे असते. त्यासाठी एकमेकांचे पाय खेचणे किंवा इतरांसोबत स्पर्धा लावणे ही एक कॉमन गोष्ट झालेली दिसते... आपल्या प्रतिस्पर्धीला टक्कर कशी द्यायची किंवा त्याच्या पुढे कसे जायचे याचाच विचार अनेक जण करताना दिसतात...

काही जण दुसऱ्यांच्या मागे लपून शौर्य दाखवण्यात स्वतःचे मोठेपण समजतात. दुसऱ्यांचे चांगले काम स्वतःचे म्हणून सांगतात. लपवाछपवी, लबाडी करून दुसर्यांचा हक्क सुद्धा खेचून घेण्यात भीत नाहीत... पण पुढे जाण्यासाठी नक्की या गोष्टींची गरज आहे का? याचा विचार सुद्धा केला जाणे आवश्यक आहे... 


आजच्या घडीला सभोवताली इतरांच्या पाठीमागे दडून स्वतःचे शौर्य दाखवणाऱ्यांचे प्रमाण वाढताना आपल्या नजरेस पडते. याच मानसिकतेचा फायदा घेऊन सध्या भोळ्या लोकांना फसवले जाते...  
हे सर्व करण्याची गरज तेव्हाच निर्माण होते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दल निश्चित नसते. स्वतःवर विश्वास नसेल तेव्हा एक तर व्यक्ती घाबरट बनते नाही तर अशा प्रकारे इतरांशी चुकीचे वागू लागते... पण पुढे जाण्यासाठी अशा गोष्टींची गरज नसतेच...


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


भले ही चांगल्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कठीण असेल तरीही चुकीच्या वाटेने जाण्यापेक्षा कठीण मार्गच निवडावा.. आज एका ठिकाणी स्वतःची जबाबदारी इतरांवर ढकलणाऱ्या व्यक्ती असतील तर दुसरीकडे परिस्थितीला न घाबरता स्वतः पुढे होऊन जबाबदारी उचलणारी पिढी सुद्धा निर्माण होताना दिसत आहे. तोंडावर गोड पण पाठीमागे आपल्याबद्दलच वाईट बोलणारे अनेक जण असतात. ही आजची वस्तुस्थिती आहे. बरेच लोक ही माझी एकट्याची जबाबदारी नाही, हे माझे काम नाही म्हणून आरडाओरड करत असतात तर काही जण शांतपणे आपल्या कामात व्यस्त राहून प्रगतीकडे वाटचाल करताना दिसतात...


आपण सर्वांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की नदी कधीही सरळ वाहत नाही... ती नेहमी नागमोडी आणि संथ वाहते. आयुष्यसुद्धा सरळ असूच शकत नाही... ते नागमोडीच असणार, हे सर्वांनी स्वीकारले पाहिजे. आयुष्य नागमोडी आहे म्हणूनच ते छान आहे. आपल्या आयुष्यातसुद्धा वेगवेगळी वळणं येतात. आपल्या आयुष्यातही अशा पाय खेचणाऱ्या व्यक्ती येतात. पण त्यांचा विचार न करता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिले तर आपण लवकरच यशस्वी होऊ शकतो. आपल्या ध्येयाच्या वाट्यात जरीही अशा व्यक्ती आल्या तर त्यांचा विचार न करता आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत राहिले पाहिजे... 

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


यासाठी गरज आहे ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची.. स्वतः पॉझिटिव्ह राहिले तर समोरच्यांना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो हे आपण सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. याकरिता एक दिवस आपल्या स्वतःसाठी द्या, एक दिवस स्वतःचा अभ्यास करा, आपल्या चुका शोधा,आणि त्या चूका आपल्या आयुष्यात पुन्हा नाही होणार याची काळजी घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. वाईट किंवा दुष्ट लोकांकडे दुर्लक्ष करा. नेहमी पॉझिटिव्ह रहा. आयुष्यात काहीही झाले तरी चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नका. आपले ध्येय निश्चित करा, त्यानुसार आपली वाटचाल करा. हे लक्षात घ्या की आपली स्पर्धा स्वतःशीच आहे, इतरांशी नाही. तेव्हा आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही..