घरगुती जेवणाची इच्छापूर्ती करणारे हेमंत लोहगावकर यांचे 'माय टिफीन' !

घरगुती जेवणाची इच्छापूर्ती करणारे हेमंत लोहगावकर यांचे 'माय टिफीन' !

जेवण कोणत्याही प्रकारचे असो, ताटातला पदार्थ खाताना त्याच्या चवीने माणूस तृप्त झाला की जेवण बनवणाऱ्याची मेहनत सार्थकी लागली असे म्हणतात. हे अगदीच खरे आहे. एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचे असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो. जेवण चांगले असेल तर खराब झालेला मूड सुद्धा चांगला होतो. ही जादू फक्त जेवणात असते. माणसाने खावे पण उत्तम आणि चवदार खावे. त्याचा दर्जा आणि चव उत्तम असले पाहिजे. अगदी बाहेर असलो तरीही खाण्याचा दर्जा आणि चव उत्तमच असली पाहिजे असा काही जणांचा हट्टच असतो. 

आज अनेक लोक नोकरी किंवा इतर कारणांमुळे आपल्या घरापासून दूर राहतात. अशावेळी घरगुती जेवणाचे हाल तर होतातच शिवाय खाण्याचा दर्जा वगैरे चोचले पूर्ण करण्यासाठी अनेकांना वेळही मिळत नाही. जे ताटात पडेल ते खावे अशी परिस्थिती.. तर काही जण अगदी दर्जेदार जेवण मिळावे म्हणून छोट्या खाणावळीपासून ते मोठमोठी हॉटेल आणि रेस्टोरेंट्स पालथी पाडतात. अशा लोकांसाठीच हेमंत लोहगावकर यांनी खाद्यसेवा व्यवसाय सुरु केला... 


'माय टिफीन'ची सुरुवात... हेमंत लोहगावकर हे मूळचे अहमदनगरचे. वडील सतत कामानिमित्त बाहेर असायचे, आई कामाला जायची. यामुळे शाळेत असतानाच त्यांना स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. स्वत: करून खायची सवय लागली. स्वयंपाकाच्या आवडीमुळे त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते; पण त्या काळी या क्षेत्रात फारशी मागणी नव्हती. म्हणून वडिलांनी सांगितल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही; पण वीस वर्षे नोकरी केल्यानंतर ती इच्छा त्यांनी पूर्ण केली. हॉटेल मॅनेजमेंट तर करता आले नाही; पण जेवणाचा व्यवसाय मात्र करून दाखवला.

हेमंत लोहगावकर ज्या वेळी नोकरी करत होते तेव्हा त्यांना कामाच्या निमित्ताने महिन्यातील वीस ते बावीस दिवस बाहेर राहावे लागायचे. कामानिमित्त भारतभर प्रवास व्हायचा, त्यामुळे सतत बाहेरचे जेवण जेवायला लागायचे. सतत बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना खाद्य व्यवसायाची कल्पना सुचली. आपल्यासारखे अनेक लोक कामाच्या निमित्ताने घरापासून दूर राहतात; आपल्याप्रमाणे त्यांनाही घराच्या जेवणाची आठवण येत असणार, असा त्यांनी विचार केला. अशा लोकांची अडचण दूर करण्यासाठी जन्म झाला 'माय टिफिन’चा.. 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


बिझनेससाठी सर्व्हे... कोणताही बिझनेस सुरु करण्याआधी सर्व्हे करण्याची गरज असते हे हेमंत जाणून होते. जवळजवळ तीन वर्षे ते या व्यवसायाच्या सर्व्हेसाठी फिरले. मुंबई, जळगाव, कानपूर, बंगळुरू, दिल्ली अशा शहरांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला. वेगवेगळ्या खानावळी, हॉटेल्समध्ये जाऊन माहितीतल्या लोकांना ते भेटले. 332 मेसना भेट दिली व तिथे कोणत्या प्रकारचं जेवण बनतं याविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर बाहेर काम करणार्‍या सुमारे 5 हजारहून अधिक व्यक्तींशी त्यांच्या आवडीनिवडीबद्दल चर्चा केली. आपला व्यवसाय हा सकारात्मकतेच्या आणि चांगुलपणाच्या पायावर उभा असावा असे त्यांना वाटत होते म्हणून या सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक होते. जे करायचं ते चांगलंच करायचं असा ध्यास त्यांनी घेतला होता. व्यवसायातील अडचणी, लोकांना काय आवडतं, कोणत्या पद्धतीचं आवडतं, कच्चा माल कुठे मिळेल अशा सर्व गोष्टींचा अंदाज घेण्यात आला आणि ‘माय टिफिन’ची सुरुवात झाली. वीस वर्षांच्या नोकरीमध्ये भारतभ्रमण करत असताना हेमंत यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे महाराष्ट्राचे पदार्थ सगळीकडेच मिळत नाही. भारतात इतर ठिकाणी काय तर महाराष्ट्रातील हॉटेल्समध्येही मराठी पदार्थांचा दुष्काळ असतो. पंजाबी, साऊथ इंडियन, चायनिज पदार्थांचा अक्षरश: मारा असतो. थालीपीठ, बिरडं, मोदक, पुरणपोळी, अळूचं फदफदं असे मराठमोळे पदार्थ सहसा हॉटेलमध्ये मिळत नाहीत. लोकांची ही गरज हेमंत लोहगावकर यांनी भागवली. 


गुणवत्ता... गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही, असं त्यांनी आधीपासूनच ठरवलं होतं. गुणवत्ता आणि स्वच्छतेबद्दल ते इतके आग्रही आणि पारदर्शक आहेत, की त्यांनी जेवण बनवल्या जाणार्‍या किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, जेणेकरून ग्राहक कधीही स्वच्छतेबद्दलची खात्री करून घेऊ शकतात. स्वच्छ व सुंदर किचन हा त्यांचा पायंडाच आहे. ग्राहकांना चवीबरोबर त्यांचे स्वच्छ किचनसुद्धा आकर्षित करते. यामुळेच माय टिफिनला बेस्ट हायजिन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच या सेवेला आयएसओ मानांकनसुद्धा मिळाले आहे. आयएसओ मानांकन मिळणारी ही महाराष्ट्रातील प्रथम आणि एकमेव टिफिन सेवा आहे. उत्कृष्ट चव आणि उत्तम गुणवत्ता यामुळेच ‘माय टिफिन’ची झपाट्याने वाढ होत गेली. 


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


वाढता व्यवसाय... पन्नास डब्यांपासून या व्यवसायाची सुरुवात झाली आता हा व्यवसाय रोजच्या दीडशे डब्यांपर्यंत पोहोचला आहे. 50 ते 52 ग्राहकांपासून आता सत्तर हजार ग्राहकसंख्या झाली आहे. तरुणांना या व्यवसायात आणण्यासाठी ते पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा येथे फ्रँचायजी सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. फ्रँचायजीच्या माध्यमातून त्यांना नोकरी देणारे व्यावसायिक घडवायचे आहेत. मराठी उद्योजकता वाढावी यासाठी ते तरुणांना भांडवल उपलब्ध करून देणे, ते व्यवसायात यशस्वी कसे होता येईल अशा सर्व प्रकारे सहकार्य करणार आहेत. तसेच भविष्यात त्यांना रेस्टोरेंट सुद्धा सुरू करायचे आहे. 


व्यवसायात चिकाटी, सेवाभाव, कष्ट करण्याची तयारी आणि नेतृत्वगुणाचे अंग असावे लागते. ज्यांना कुणालाही व्यवसायात यायचे आहे त्यांनी हेमंत लोहगावकर यांचा आदर्श समोर ठेवायला हवा.