मराठी उद्योजिका जयंती कठाळे यांच्या 'पूर्णब्रह्म'चा प्रवास सातासमुद्रापार!

मराठी उद्योजिका जयंती कठाळे यांच्या 'पूर्णब्रह्म'चा प्रवास सातासमुद्रापार!

मोठे स्वप्न बघा... ते पूर्ण करण्यासाठी धडपड करा… वाटेत ठेच लागून खाली पडाल तरीही उठून पुन्हा मार्गक्रमन करा... पुन्हा सर्व ताकदीनिशी उठा, सर्व प्रयत्न पणाला लावा.. यश नक्की तुमचेच होईल. हा मूलमंत्र अनेक यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक देतात आणि स्वतःही त्याचे पालन करतात. असेच एक मोठे स्वप्न उराशी बाळगून मराठ मोळ्या जयंती कठाळे या आज एक यशस्वी महिला उद्योजिका बनल्या आहेत.

खाद्यक्षेत्राची गरज... जयंती कठाळे या मूळच्या नागपूरच्या. आयटी क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या. नोकरीनिमित्त देशोदेशी प्रवास करत शेवटी त्या बंगलुरुमध्ये संपूर्ण परिवारासोबत स्थायिक झाल्या. अमराठी शहरात, देशात मराठमोळ्या पदार्थांच्या आठवणीने त्या व्याकुळ होत असत. एकदा तर पती व ३ महिन्याच्या बाळाला घेऊन २७ तासांचा विमान प्रवास त्यांना शाकाहारी जेवणाअभावी ब्रेड-बटर खाऊन करावा लागला. विशेषत: ह्या प्रसंगानंतर त्यांना खाद्यक्षेत्र व्यवसायात उतरावे असे प्रकर्षाने वाटू लागले. 

आयटीमधील नोकरीचा त्याग... कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच एक दिवस त्यांनी आयटीतील सुखाची नोकरी सोडविण्याचे ठरवले आणि बंगलुरु शहरात ‘पुर्णब्रह्म’ नावाचे हॉटेल सुरु केले. मराठी माणसाकडे स्वयंपाकातील इतकी चांगली कला आणि परंपरा असताना ते पदार्थ अमराठी माणसांपर्यंत आणि परदेशात का पोहोचू नयेत या एका ध्येयाने त्यांचा हा प्रवास सुरु झाला. 


जेवण बनविण्याची आवड... जयंती यांचा जन्म संयुक्त कुटुंबातला. घरात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात असूनही, त्यांनी आजीच्या हाताखाली चटणीपासून पुरणपोळीपर्यंत सर्व पदार्थ आवडीने शिकून घेतले. सरावाने त्यांच्या हाताला चव आली. मराठमोळे पदार्थ खाण्याची आणि खिलवण्याची आवड असल्यामुळे त्यांनी बंगलुरुमधल्या अमराठी लोकांनाच काय, तर परदेशातल्या फिरंग्यांनाही पुरणपोळीची गोडी लावली. 

सोशल माध्यमाचा पुरेपूर वापर... जयंती यांनी आपली नोकरी सांभाळून उत्सवाप्रसंगी पुरणपोळी आणि मोदक करून विकण्यास सुरुवात केली. तेव्हा 'ऑर्कुट' या सोशल माध्यमाचा त्यांनी यासाठी पुरेपूर वापर करून घेतला. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. २०१२-१३ मध्ये, त्यांनी 'पूर्णब्रह्म' नावाचे स्वतःचे मराठमोळे उपाहारगृह बंगलुरुमध्ये सुरु केले. 

महाराष्ट्रभर फिरुन संशोधन... ‘पूर्णब्रह्म’ची स्थापना करण्यापूर्वी जयंती यांनी सहा महिने बंगलुरुरमधील छोट्या-मोठ्या प्रत्येक उपहारगृहात जाऊन तिथल्या परिस्थितीचा, पदार्थांचा, सेवेचा, दराचा, गुणवत्तेचा बारकाईने अभ्यास केला. पदार्थांची गरज लक्षात घेतली. महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांत जाऊन तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची चव चाखली. आपल्याला ग्राहकांना वेगळे काय देता येईल? अमराठी माणसाला मराठी पदार्थांकडे आकर्षून कसे घेता येईल? इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला. मित्रपरिवाराचा सल्ला घेतला आणि ‘पूर्णब्रह्म'ची निर्मिती झाली.


आलिशान उपाहारगृहाची सुरुवात... सुरुवातीला दोन सहकाऱ्यांच्या मदतीने छोटेसे रेस्टॉरंट सुरु केले. लोकांचा प्रतिसाद वाढू लागला, तशी जागेची उणीव भासू लागली. काही काळातच त्यांनी बंगलुरुमधील एचएसआर  लेआऊट या उच्चभ्रू भागामध्ये ५,७०० चौरस फूट जागेत 'पूर्णब्रह्म'चे आलिशान उपाहारगृह थाटले. ते आता बंगलुरुमधील मराठी पदार्थ खाऊ घालणारे उत्तम दर्जाचे उपहारगृह म्हणून ओळखले जात आहे. हे यश एका रात्रीतले नाही, तर यामागे जयंती आणि त्यांच्या साथीदारांची सुद्धा मेहनत आहे. 

२०० जणांची पंगत... सर्व मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद आपण महाराष्ट्रात राहून घेत आहोत, असा ग्राहकाला 'फील' यावा, या दृष्टीने ‘पूर्णब्रह्म’ उपाहारगृहात वातावरणनिर्मिती केली आहे. एकावेळी २०० जणांची पंगत बसू शकेल, अशी चौरंग-पाटाची भारतीय बैठक. 'पूर्णब्रह्म’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महिलांना प्राधान्य दिले जाते. कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के महिला आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणे पगाराच्या बाबतीत स्त्री-पुरुष यांच्या पगारात भेदभाव केला जात नाही. 

सुधा मूर्तींशी भेट... फ्रँचायझी देतानाही महिलांना प्राधान्य देण्याकडे जयंती यांचा कल असतो. त्यांच्या मते, `प्रत्येक महिला ही अन्नपूर्णा आहे. तिच्या कलेला ह्या निमित्ताने मोठे व्यासपीठ आणि त्यातून उत्पन्न मिळवून देणे, हे ‘पूर्णब्रह्म’चे उद्दिष्ट आहे!’ जयंती आयटीक्षेत्रात असल्याने त्यांच्या आदर्श म्हणजे ‘इन्फोसिस’च्या संस्थापिका सुधा मूर्ती आहेत. त्यांनी जयंती यांच्या आग्रहाखातर ‘पूर्णब्रह्म’ला भेट दिली. त्यांनाही हा उपक्रम आवडला. पुण्यात आणि बंगळुरू येथील इन्फोसिसमध्ये पूर्णब्रह्मच्या शाखा सुरू करण्यासही त्यांनी परवानगी दिली. मुंबईत अंधेरी येथेही पूर्णब्रह्मची शाखा सुरू झाली आहे. फिलाडेल्फिया आणि शिकागो येथे शाखा सुरू होण्याच्या मार्गावर आहे, तसेच मुंबई-दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरही शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. 

जयंती यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमामुळे अनेक भारतीयांना मराठमोळे चविष्ट पदार्थ चाखायला तर मिळत आहेतच, शिवाय अनेक हातांना रोजगार, मोठे व्यासपीठ, कामाचे समाधान आणि आनंद मिळत आहे.