'डी-मार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमानी यांची यशोगाथा !

'डी-मार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमानी यांची यशोगाथा !

आपण अनेकदा जोखीम पत्करायला नकार देतो. आपल्या मनात अपयशी होण्याची भीती असते. पण जी व्यक्ती धोका पत्करून स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला यश नक्की मिळते. अशाच स्वकर्तृत्वावर आज एक यशस्वी व्यवसाय उभा करून दाखवणारे राधाकिशन दमानी हे नाव सर्वांच्या ओळखीचे झाले आहे. आपल्या सर्वांच्या आवडीचे 'डी-मार्ट' या भारतातील सर्वात मोठ्या रिटेल चेनचे संस्थापक हे राधाकिशन दमानी आहेत. 

62 वर्षांच्या राधाकिशन दमानी यांनी आज भारतीय शेअर बाजारात सुद्धा धुमाकूळ माजवला आहे. त्यांची कथा नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. 


सुरुवातीचा काळ... कॉमर्सचे शिक्षण अर्धवट सोडलेल्या राधाकिशन यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलबेअरिंग व्यावसायिक म्हणून कामाला सुरुवात केली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी भावाच्या बरोबरीने ‘स्टॉक ब्रोकिंग’ व्यवसायात उडी घेतली. तेव्हा त्यांचे वय होते जेमतेम 32 वर्ष. शेअर मार्केटबद्दल त्यांना जराही कल्पना नव्हती. स्टॉक, कॅपिटल, निफ्टी, सेन्सेक्स, दलाल स्ट्रीट या कशाचीच त्यांना माहिती नव्हती. पण हळूहळू त्यांनी सर्व माहिती करून घेत जम बसवला. शेअर मार्केट क्षेत्रातल्या मोठमोठ्या मातब्बरांना त्यांनी फॉलो करणे सुरु केले. शेअर मार्केट मधील सर्व बारकावे टिपून घेतले. ‘ट्रेडर’ आणि ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ या दोन्ही गोष्टींत त्यांचा जम बसला. त्यांचा हा स्टॉक मार्केटचा व्यवसाय तेजीत असताना सुद्धा त्यांना रिटेल कन्झ्युमर बिझनेस करण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते.

 
रिटेल व्यवसायाची सुरुवात.... दमाणी यांनी स्टॉक मार्केटचा व्यवसाय काही वर्षे बाजूला ठेवून रिटेल व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान क्रॉफर्ड मार्केट ते एपीएमसी मार्केट अशा नानाविध बाजारपेठांचा अभ्यास यांनी केला. काय खपतं, कसं विकलं जातं, कसं विकावं, कसं विकू नये हे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांशी बोलून समजून घेतले. यादरम्यान त्यांनी नेरुळमध्ये 'अपना बझार'ची फ्रँचाइजी विकत घेतली. 2003 मध्ये पवई मध्ये स्वत:चे सुपरमार्केट सुरू केले. एका छपराखाली किराणा, घरगुती साहित्य, कॉस्मेटिक्स, कपडे, चपला, खेळणी, स्टेशनरी मिळावी अशी या सुपरमार्केट्ची रचना होती. परंतु इतर दुकानांच्या व सुपर मार्केट्सच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आपल्या व्यवसायात काही वेगळेपण असणे आवश्यक होते हे दमानी जाणून होते.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


व्यवसाय वाढविण्यासाठी रिसर्च... त्यांनी मार्केट रिसर्च करून उत्पादनांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत 6 ते 8 टक्क्य़ांनी खाली आणल्या. शेकडो टन माल एकदम खरेदी केल्यामुळे ग्राहकाला कमी किमतीत माल विकणे शक्य झाले. गरीब ते श्रीमंत या पोकळीतला मध्यमवर्ग हा त्यांचा टार्गेट ऑडियन्स ठरला. मॉलमध्ये सुपरमार्केट सुरु करण्याचे त्यांनी टाळले. दर्जा असेल तर ग्राहकराजा संतुष्ट होतो हे तत्त्व बिंबवून स्वच्छ धान्य, काटेकोर पॅकिंग, वस्तूंची नेटकी मांडणी आणि घेतलेल्या वस्तू कॅरी करण्यासाठी पुरेशा ट्रॉलीज आणि बकेट्स यांची व्यवस्था त्यांनी आपल्या सुपरमार्केटमध्ये केली.

शहराशहरांत 'डी-मार्ट'... सुपरमार्केटची जागा भाड्याने घेण्याऐवजी विकत घेण्यावर दमानी यांचा भर दिला. शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यायेण्याच्या दृष्टीने सोयीची अशी जागा घेऊन त्यांनी आज विविध शहरांत 'डी-मार्ट' उभारले आहे. मोठं पॅकेज देऊन स्मार्ट माणसांना भरती करण्यापेक्षा दहावी पास माणसाला घेऊन त्याला सर्वसमावेशक ट्रेनिंग देण्यावर दमानी यांचा भर असतो. यामुळे ज्या शहरात त्यांचे डी-मार्ट असते त्याच्या गावातील मुलामुलींना काम या सुपरमार्केटमध्ये काम मिळते. ऑनलाइन खरेदी ट्रेण्डिंग असतानाही दमानी यांनी प्रत्यक्ष खरेदीविक्रीवरच भर दिला. 

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


शेअर बाजारात उडी... वायफळ जाहिराती आणि अविचारी एक्स्पान्शन हे दमानी यांच्या तत्त्वात नाही. म्हणूनच गेल्या 15 वर्षांत त्यांनी कोणतीही जाहिरात केली नाही. तरीही त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षीचा कंपनीचा निव्वळ नफा आहे 3.2 बिलियन. राधाकिशन दमानी यांच्या डी-मार्ट कंपनीचे नाव एव्हेन्यू सुपरमार्केट असे आहे. 2017 साली त्यांनी शेअर मार्केटमध्ये या कंपनीला उतरवले. हा निर्णय त्यांच्यासाठी एक गेम चेंजर ठरला. त्यांची संपत्ती कैक पटींनी वाढली. शेअर बाजारात उतरल्यानंतर त्यांनी प्रति शेअर 295 ते 299 रुपये या दराने विकला होता. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

फोर्ब्सतर्फे तयार करण्यात आलेल्या लब्ध-प्रतिष्ठितांच्या यादीत राधाकिशन दमानींचे नाव आहे. जोखीम पत्करून स्वतःची कंपनी उभी करून त्यांनी 15 वर्षांत ती देशात अव्वल बनवली  आहे.