मुंबईचा डबेवाला; जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंटची शिकवण...

मुंबईचा डबेवाला; जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंटची शिकवण...

मॅनेजमेंट हा विषय बिझनेस आणि आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. मॅनेजमेंट नसेल तर कोणत्याही कामाची ध्येयपूर्ती होणार नाही. समजा आपल्या कोणतेही काम दिले, ते काम कसे करायचे यावर आपण विचार न करताच त्या कामात हात घातला तर त्यात अनेक अडचणी येतात आणि शेवटी ते काम होत नाही. त्यास आपण (Poor Management) अयोग्य व्यवस्थापन असे म्हणतो. म्हणूनच कोणतेही काम करताना मॅनेजमेंट अधिक महत्त्वाचे आहे. आणि वर्ल्डक्लास मॅनेजमेंटचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मुंबईचा डबेवाला. मार्गात कितीही अडथळे आले तर लंचपूर्वी ग्राहकांना टिफीन पुरवणे, हेच डबेवाल्यांचे ध्येय असते.

डबेवाल्यांचा इतिहास… देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी म्हणजेच 1890 साली महादेव बच्छे यांनी 100 जणांना एकत्रित आणून मुंबईतील पहिली डबा पुरविण्याची सेवा सुरू केली. नंतर 1956 साली नूतन ‘मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर ट्रस्ट’ या नावाखाली या सेवेची स्थापना करण्यात आली. वारकरी कुटुंबाची परंपरा असलेला पांढरा विजार, पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेला माणूस, अशी मुंबईच्या डबेवाल्याची ओळख बनली आहे.


ही टिफीन सर्व्हिस नाही… अनेकांना वाटते मुंबईचा डबेवाला म्हणजे टिफीन अथवा जेवण पुरवणारी सेवा आहे. परंतु, ही टिफीन सर्व्हिस नाही. मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात कर्मचारीवर्ग सकाळीच आपल्या घरातून ऑफिससाठी निघतात. तेव्हा एवढ्या लवकर डबा तयार करणे अनेक गृहीणींना शक्य नसते. तसेच सकाळी तयार केलेले अन्नही ताजे राहत नाही. म्हणूनच आपल्या आईने किंवा गृहीणीने बनवलेला ताजा टिफीन हे डबेवाले मुंबईभर पसरलेल्या कार्यालयात पोहोचविण्याचे काम करतात.


कशी असते डबेवाल्यांची मॅनेजमेंट… मुंबईचा डबेवाला म्हटलं की डबा वेळेतच पोहोचणार, हे एक समीकरण ठरलेलंच आहे. मुंबई शहरातील धकाधकीचं जीवनं, लोकलची अनिश्चतता, ट्रॅफिक यामधून मार्ग काढीत डब्बेवाले आपल्या डब्ब्यांची डिलीव्हरी वेळेत करतात. बरं हे डब्बेवाल्यांचे शिक्षण कमी झालेले असते. काहींनी तर शाळेची पायरीच चढलेली नसते. अशात ते आपला डब्बा वेळेत पोहचवतात. डब्बेवाले जेथून डब्बा गोळा करतात तिथल्या जागेला एक नाव देतात. सुरुवात केलेल्या स्टेशनला कलर कोडने नाव देतात, तसेच जिथं डब्बा द्यायचा आहे ते स्टेशन क्रमांकाने लक्षात ठेवतात. अशाप्रकारे प्रत्येक डब्ब्यावर कोड लिहलेले असतात. त्यानुसार मुंबईचे डबेवाला डब्बा वेळेत व न चुकता पोहचतो.


डबेवाल्यांची कमाई… सर्वाधिक मुंबईकरांना डब्बा पुरविण्याचे काम करणा-या मुंबईच्या डब्बेवाल्यांना प्रति महिना 8 ते 10 हजार मिळतात. शहरातील किमान पाच हजार डबेवाले दोन ते तीन लाख सरकारी, निमसरकारी किंवा एमएनसीमधील कार्यालयात डबे पोहचवतात व तेथून पुन्हा घरी आणून देतात. एका अहवालादरम्यान असे लक्षात आले की, एक अब्ज डबे पोहोचवल्यावर एखादी चूक डब्बेवाल्यांकडून घडते. इतके मुंबईच्या डबेवाल्यांचे मॅनेजमेंट पक्के आहे. म्हणूनच देश-विदेशातील मॅनेजमेंटचे गुरु मुंबईच्या डबेवाल्यांवर रिसर्च करतात. तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या कार्याची नोंदही करण्यात आली आहे.