आयपीएलची कमाई नक्की होते कशी?

आयपीएलची कमाई नक्की होते कशी?

जगभरातील सर्वांत मोठी क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमधून जगभरातील क्रिकेटर्स बक्कळ पैसा कमावतात. लिलावाच्या माध्यमातून क्रिकेटर्सना पैसा मिळतो. पण फक्त फ्रॅन्चायसीकडूनच आयपीएल आणि खेळाडूंना पैसा मिळतो असं नाही. आयपीएलला पैसा मिळण्याचे अनेक माध्यमं आहेत. या विविध माध्यमातून आयएलची अगणित कमाई होते.  आयपीएलचं हे अर्थकारण नक्की कसं आहे ते जाणून घेऊया.
बीसीसीआयने जारी केलेल्या २०१५ च्या आकडेवारीनुसार आयपीएलने जवळपास ११५० कोटींची कमाई केली जी भारताच्या एकूण जीडीपीच्या जवळपास जाणारी होती. जाहिराती, स्पॉन्सर्स, ब्रॉडकास्टिंग, मर्चंडाईज आदी विविध माध्यमातून आयपीएलला कमाई होत असली तरीही बीसीसीआय आयपीएलच्या माध्यमातून मिळणार्या कमाईवर एक रुपयाही टॅक्स भरत नाही.

ब्रॉडकास्टिंग

आयपीएलला सर्वात जास्त निधी मिळतो तो ब्रॉडकास्टिंगकडून. सध्या आयपीएलचे ओटीटीवर ऑनलाईन स्ट्रिमिंगही केले जाते. ज्या चॅनेलवर ही मॅच दाखवली जाते त्या चॅनेलकडून आयपीएल आयोजकांना मोठी रक्कम मिळते. आयपीएलची सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजेच २००८ ते २०१७ काळात सोनी वाहिनीने बीसीसीआयला जवळपास ८ हजार कोटी रुपये ब्रॉडकास्टसाठी दिले. तर, स्टार स्पोर्ट्सने फक्त पाच वर्षांसाठी १६ हजार ३७० कोटींची ब्रॉडकास्टिंगसाठी ऑफर दिली. म्हणजेच सोनीपेक्षा चौपट पैसे स्टार स्पोर्ट्सने दिले. सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील वर्षाच्या आयपीएलच्या ऑनलाईन स्ट्रिमिंगसाठी जेफ बेझॉस आणि मुकेश अंबानी 50,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत. 


आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्या पैशांचं बीसीसीआय करतं  काय? तर, बीसीसीआय हे पैसे आयएपीएलमध्ये खेळणाऱ्या संघाला देते. जगभरातील क्रिकेट प्रेमींपैकी ९० टक्के क्रिकेटप्रेमी भारतात राहतात. त्यातही आयपीएलचा आनंद एखाद्या सोहळ्यासारखा घेतला जातो. २०२१ च्या सीझनमध्ये आयपीएल जवळपास ३६७ मिलिअन लोकांनी पाहिली, हीच आकडेवारी २०१९ मध्ये १८८ मिलिअन होती. म्हणजेच, दोन वर्षांत पाहणाऱ्यांची संख्या १४ टक्क्यांनी वाढली. प्रेक्षकसंख्या वाढत असल्याने ब्रॉडकास्टिंगसाठी चॅनेल्समध्ये चढाओढ सुरू आहे. 

मर्चंडाईज

आयपीएलचे मर्चंडाईज म्हणजेच टी-शर्ट, जर्सी, स्पोर्ट्स इक्विपमेंट आदीमधूनही पैसे कमावले जातात. कोणत्याही टीमची जर्सी पाहिली तरी तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक टीमच्या जर्सीवर जाहिरातदारांचे लोगो लावलेले असतात. जर्सीवर कोणत्या दिशेला कंपनीचा लोगो लावायचा यावर पैसे आकारले जातात. जर्सीवर अगदी मध्यभागी कंपनीची जाहिरात करायची असेल तर शंभर कोटींहून अधिक पैसे द्यायला कंपनी तयार असते. खेळाडूंची जर्सी ही जाहिरातीचा सर्वात मोठा भाग आहे. खेळांडूच्या आऊटफिटवर जवळपास १० लोगो असतात. सहा लोगो जर्सीवर, दोन पॅन्टवर तर उर्वरित दोन लोगो कॅपवर असतात. 


एवढेच नव्हे तर प्रत्येक टीममधील खेळाडूला कंपनीची जाहिरात करायची संधी मिळते. त्यातही खेळाडूंची कमाई होते. या कमाईपैकी ८० टक्के कमाई खेळाडूंची तर २० टक्के कमाई बीसीसीआयला दिली जाते. 

तिकिटे

प्रत्येक मॅचसाठी जवळपास ५ कोटींची तिकिट विक्री केली जाते. आयपीएलच्या एकूण कमाईपैकी तिकिटी विक्रीतून १० टक्के कमाई होते. इतर स्पर्धेप्रमाणे आयपीएललाही तिकिट विक्रीतून तुफान नफा मिळतो.

स्पॉन्सर्स

प्रत्येक स्पर्धा  किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी स्पॉन्सर्स फार महत्त्वाचे असतात. आयपीएलमध्ये स्पॉन्सर्स फार महत्त्वाची भूमिका बजावतात. स्पर्धेतील बॅट, स्टम्पपासून जर्सीपर्यंत  प्रत्येक गोष्ट स्पॉन्सर केली जाते. तर, आयपीएल टायटल स्पॉन्सर्समधूनही बक्कळ कमाई केली जाते. आयपीएलचे टायटल स्पॉन्सर बनण्यासाठी टाटांनी २ वर्षांसाठी ६७० कोटी रुपये दिले आहेत. 


पण आयपीएल टॅक्स फ्री कसा?

आयपीएलचे सामने खेळवून बीसीसीआयला बक्कळ पैसा मिळतो. मात्र, या खेळातून मिळालेल्या एकाही रुपयाचा कर भरला जात नाही. कारण, बीसीसीआय एक चॅरिटेबल ऑर्गनायजेशनन (सामाजिक संस्था) आहे. ज्यामार्फत क्रिकेट या खेळाला प्रोत्साहन दिले जाते. इन्कम टॅक्सच्या सेक्शन १२ A अंतर्गत इन्कम टॅक्स अक्ट १९६१ नुसार, चॅरिटेबल ट्रस्टना करातून सूट दिली जाते.  म्हणजेच, बीसीसीआयने आयपीएलच्या माध्यमातून कितीही पैसा कमावाला तरी त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. 

याविरोधात एक याचिकाही दाखल झाली होती. आयपीएल ही स्पर्धा असली तरी  त्यातून लोकांचं मनोरंजन  होतं, त्यामुळे त्यावर  कर आकारला जावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून बीसीसीआयला दिलासा दिला.