ऐन तिशीत रिचाने उभारला 700+ कोटींचा लाँजरी बिझनेस

ऐन तिशीत रिचाने उभारला 700+ कोटींचा लाँजरी बिझनेस

यशस्वी महिला उद्योजिका अशी ओळख असलेल्या रिचा कर ही मुळची जमशेदपूरची आहे. १२ वी नंतर तिने इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने एमबीएची पदवी घेतली. रिचा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचे वडील टाटा स्टील कंपनीत कामाला होते. सुरुवातीला तिने काही आयटी कंपन्यांमध्ये काम केलं. भारतातील लाँजरी मार्केटवर रिसर्च करताना रिचाला या क्षेत्रात बिझनेस सुरू करण्याची इच्छा झाली. तिच्याकडे अनेक कल्पना होत्या. भारतातल्या लाँजरी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करण्याचं तिने ठरवलं. आपला झिवामे नावाचा ब्रँड सुरू करून अनऑर्गनाइझ्ड इंडस्ट्रीला ऑर्गनाइझ्ड करण्याचं काम तिने 2011 पासून सुरू केलं. 
प्रॉब्लेम सॉल्व्हींग प्रोडक्ट 
मार्केटमध्ये क्रांती घडवून आणण्याचं कसब प्रत्येक कंपनीकडे असतं जर तुम्ही मार्केटमध्ये असलेली कमी भरून काढत असाल. किंवा काही नवा बदल घडवून आणत असाल. रिचाने तिच्या कंपनीच्या माध्यमातून मार्केटमधील अनेक समस्यांचं निवारणही केलं आणि क्रांती सुद्धा घडवली. 
आजही भारतात महिलांना आंतरवस्त्रांची खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक दुकानांमध्ये पुरुष सेल्समन असतात. अशावेळी महिला त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही, परिणामी महिलांना अशा ठिकाणी खरेदी करणे गैरसोईचे होते. काही मोठी शहरं सोडली तर चांगल्या ब्रँडची आंतरवस्त्रे आजही खूप कमी ठिकाणी विकली जातात. त्यामुळे महिला सामोऱ्या जात असलेल्या या समस्यांचा विचार करून रिचा कर या तरुणीने झिवामे हा महिलांसाठी आंतरवस्त्र खरेदीचा ब्रँड भारतभर सुरू केला.    
कोणताही बिझनेस करताना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असाच काहीसा संघर्ष रिचालाही करावा लागला होता. सुरुवातीला अनेकांनी तिच्या या बिझनेस आयडियाचं हसं केलं. तिच्या नातेवाईकांना देखील तिची ही बिझनेस आयडिया फारशी रुचली नव्हती. लाँजरी बिझनेस साठी भाड्याने जागा मिळवणे देखील तिला कठीण गेले, अनेक नकार स्वीकारावे लागले, परंतु तिचं ध्येय पक्कं असल्यामुळे तिला कोणीही रोखू शकले नाही. 2011 मध्ये कंपनी सुरू केल्यावर 2015-16 मध्ये तिला 50 कोटींचं नुकनास सोसावं लागलं होतं, पण त्यानंतरही तिने जिद्दीनं पुढचा प्रवास सुरूच ठेवला. 2020 अखेरपर्यंत झिवामेचा एकूण टर्नओव्हर 340 कोटींचा होता. झिवामेचं वैषिष्ट्य असं की या ब्रँड अंतर्गत रिचा 5000 पेक्षा जास्त व्हरायटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100 हून अधिक साईझ घेऊन आली. झिवामे वरून ऑर्डर केलेली लाँजरी काही कारणास्तव रिटर्न करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी एकही प्रश्न विचारला जात नाही हे विशेष.
 थोडक्यात ध्येय निश्चित असेल आणि योग्य रिसर्च आणि स्ट्रॅटजी घेऊन तुम्ही मैदानात उतरलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.