बिझनेसमध्ये वेबसाईटचं महत्त्व

बिझनेसमध्ये वेबसाईटचं महत्त्व

सध्या डिजिटल माध्यमांचा जमाना आहे. जेवढं दिसणार तेवढं विकणार असंच काहीसं सूत्र रूढ झालं आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये टिकून रहायचं असेल आणि आपला ठसा निर्माण करायचा असेल तर सर्व डिजिटल माध्यमांमध्ये आपलं अस्तित्व झळकणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच फेसबुक, इंस्टाग्राम, वेबसाईट यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सतत संपर्कात असणारे बिझनेस चांगला धंदा करतात. बिझनेसच्या यशासाठी स्वतःची वेबसाईट असणं किती महत्त्वाचं आहे हे या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. 
स्वतःची बिझनेस वेबसाईट बनवणं जरी खर्चीक असलं तरी आजच्या डिजिटल युगात ते तितकंच महत्त्वाचंही आहे. वेबसाईट नसतानाही माझा बिझनेस चांगला सुरू आहे मग वेबसाईटची आवश्यकता काय? असा विचार करू नका. वेबसाईट असण्याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे वेबसाईट असेल तर तरुण वर्ग तुमच्याकडे आपोआपच खेचला जातो. कारण तुमच्या डिजिटल उपस्थितीला ते महत्त्व देतात. तुमच्या कंपनीची माहिती, तुमची सेवा/उत्पादन, तुमचा अनुभव, पत्ता, संपर्क करण्यासाठी फोन नंबर, फोटो या सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी ग्राहकांना पहायला मिळतात. शिवाय, तुमचे ग्राहक ताबडतोब तुमच्याशी संपर्क करू शकतात. तुम्ही एखादी नवी सर्व्हिस सुरू केली असेल, सूट देत असाल तर या बाबतीतल्या अपडेट्स सुद्धा तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर देता येतात. वेबसाईटची लिंक विविध समाज माध्यमांवर शेअर करता येते. ब्लॉगसाठी वेगळा विभाग असेल तर त्याची लिंक शेअर करून तुम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं. तुमच्या ग्राहकांना तुमच्या सर्व्हिसबद्दल काय वाटतं? याचे रिव्ह्यू तुम्ही तुमच्या वेबसाईटवर त्यांच्या फोटोसहीत लावू शकता. त्यामुळे नवीन ग्राहकांमध्ये तुमच्याप्रती विश्वासार्हता निर्माण होते. 
खासकरून नुकताच नवीन बिझनेस सुरू केला असेल, तर त्याची प्रसिद्धी करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट खूप फायद्याची ठरेल. नव्या बिझनेसच्या वेबसाईटची लिंक ओळखीच्या व्हॉट्सअप ग्रुप, बिझनेस ग्रुपमध्ये शेअर करून तुम्ही एका वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकता. 
बिझनेसमध्ये तुम्ही कितीही पैसा गुंतवला असेल, तुमची सर्व्हिस कितीही चांगली असली, तरी जोपर्यंत तुम्ही ते चांगल्याप्रकारे लोकांसमोर प्रेझेंट करणार नाही तोपर्यंत त्याची छाप पडणार नाही. बिझनेसमध्ये प्रोफेशनल असण्याचा तो एक भागच आहे म्हणा ना!  
तुमचे दुकान जेव्हा खुले असते तेव्हा ग्राहक तुमच्याकडे खरेदीसाठी येतात. दुकान बंद ठेवले तर धंदा थांबतो. परंतु, वेबसाईट हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही दिवस-रात्र ग्राहकांसाठी उपलब्ध राहू शकता. तुमचे प्रोडक्ट ऑनलाईन विकण्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिले, तर तिथून कधीही आणि केव्हाही ग्राहक त्यांची खरेदी करू शकतात. त्यामुळे वेबसाईट सुरू करणे हे थोडे खर्चिक असले तरी तुम्हाला होणाऱ्या नफ्यातून हा खर्च भरून निघतो. हल्ली तर असे अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही फ्री मध्ये सुद्धा वेबसाईट सुरू करू शकता.