ज्योती रेड्डी मजुरीच्या जीवनापासून 15 मिलियन डॉलरपर्यंतचा प्रवास!

ज्योती रेड्डी मजुरीच्या जीवनापासून 15 मिलियन डॉलरपर्यंतचा प्रवास!

प्रचंड इच्छाशक्ती, असामान्य आत्मविश्वास आणि जबरदस्त कार्यशक्ती असलेल्या माणसाने ठरवले तर काहीही अशक्य नसते हे आपण अनेक वेळा ऐकतो आणि अनेकजण हे आचरणात आणून पुढे येतात. त्याचप्रमाणे ज्योती रेड्डीने तिच्या चिकाटी, कठोर परिश्रम आणि असामान्य कर्तृत्वाने साऱ्या जगाला हे सिद्ध करून दाखवून दिले आहे.

 

हैदराबादच्या वारंगळ गावातल्या गरीब कुटुंबात जन्माला आलेली ज्योती पाच भावंडांमधील एक होती. लहानपण गरिबीत आणि हलाखीच्या परिस्थितीत काढताना एक वेळ अशी आली की तिच्या पालकांनी तिला अनाथाश्रमात घातले. अनाथ आश्रमात राहून सरकारी शाळेत ज्योतीचे शिक्षण सुरु झाले. सुट्टीच्या काळात ज्योती सुपेरिटेंडेंटच्या घरी घरकाम करत करत काही छोटे-मोठे कोर्स पण करायची.

 

चांगली नोकरीच आयुष्य बदलू शकेल… लहाणपणीच तिला एक गोष्ट नक्की लक्षात आली की ती शिकली आणि चांगली नोकरी मिळाली तरच तिचे आयुष्य बदलू शकेल. पण त्यांच्या आयुष्यात काही वेगळेच लिहिले होते. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि 18 व्या वर्षी त्या दोन मुलींची आई झाल्या. घर आणि मुलींना सांभाळण्यासाठी त्या शेतमजुरी करू लागल्या. त्यात त्यांना घर चालवण्यासाठी जेमतेम पाच रुपये मिळायचे.


 

कला शाखेतून शिक्षण पूर्ण… त्याच काळात 'नेहरू युवा केंद्र' येथून एक संधी चालून आली. केंद्र सरकारतर्फे तरुणांसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनांचा प्रसार करण्याचे काम ज्योतीला मिळाले; पण त्यातून मिळणारे मानधन तिच्या दोन मुलींच्या प्राथमिक गरज देखील पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे फावल्या वेळात इतर अनेक छोटे मोठे काम करण्यास सुरुवात केली. हे करत असतानाच ज्योतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठातून कला शाखेत शिक्षण पूर्ण केले. यासोबतच ती टायपिंग सुद्धा शिकली.

 

अमेरिकेला जाण्याचा निश्चय… 1997 मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्योतीला एका शाळेत 398 रुपयांच्या पगाराची विशेष शिक्षकाची नोकरी मिळाली; परंतु काहीतरी मोठं करण्याचे स्वप्न तिला शांत बसू देत नव्हते. आपल्या मुलींची भारतात सोय करून तिने अमेरिकेला जाण्याचा निश्चय केला. तिचा हा प्रवास सुद्धा तितकाच खडतर होता

 

की सॉफ्टवेअर सोल्युशन्सची स्थापना… अमेरिकेत गेल्यावर तिने वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. या विविध नोकऱ्या करताना तिच्यातील उद्योजिका जागी झाली. उद्योगासंदर्भात लागणाऱ्या सर्व पेपरवर्कची तिला पुरेपूर माहिती होती. शिवाय तिच्याकडे 40,000 डॉलर्सची जमा रक्कम होती. या उद्योगाच्या ध्यासाने झपाटलेल्या ज्योतीने स्वतःजवळ असलेली सर्व बचत पणाला लावून एक ऑफिस चालू केले - 'की सॉफ्टवेअर सोल्युशन्स' आणि आजही ज्योती ते यशस्वीपणे चालवते आहे.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

 

15 मिलियन डॉलरचा टर्नओव्हर… कोण्या एके काळी घर चालवण्यासाठी पाच रुपये मिळवणारी ज्योती आज 15 मिलियन डॉलर इतका टर्नओव्हर असलेल्या 'की सॉफ्टवेअर सोल्यूशन' या अमेरिकी कंपनीची सीईओ आहे. तिची ही कंपनी अमेरिकेतील फिनिक्स या शहरात आहे. तीन कर्मचाऱ्यांसोबत सुरू केलेल्या तिच्या कंपनीत आज शंभराहून जास्त लोक काम करतात. ज्योती आता भारतातल्या स्वतःच्या स्वप्नांवर काम करते आहे, ज्यात ती युवकांना ट्रेनिंग आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देते.

 

100 पेक्षा जास्त कर्मचारी'की सॉफ्टवेअर सोल्युशन' कंपनी आता ज्योतीच्या आघाडीच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या कार्य करीत आहे. जेव्हा ज्योतीने कंपनी सुरु केली तेव्हा पहिल्या वर्षामध्ये 1,68,000 डॉलर्सचा नफा झाला आणि तिसऱ्या वर्षापर्यंत हा नफा दहा लाख डॉलर्सवर गेला. वर्षानुवर्षे अनेक कठीण परिस्थितीतून गेल्यावर सुद्धा ज्योतीने हार मानली नाही आणि आज आपल्या कंपनीला तिने अशा स्थानावर नेऊन ठेवले आहे की तिचा टर्नओव्हर 15 मिलियन इतका आहे व तिच्या कंपनीत 100 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.

 

ज्योतीच्या दोन्ही मुली आता अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून इंजिनीअर झाल्या आहेत आणि लग्न करून अमेरिकेतच स्थायिक झाल्या आहेत.स्वतःच्या उदाहरणावरून केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक स्त्रीला अविरत प्रेरणा देण्याचे काम ज्योती करत आहे.