५० पैसे ते २ लाख प्रतिदिन कमाविणाऱ्या पॅट्रिशियाची प्रेरणादायक कहाणी !

५० पैसे ते २ लाख प्रतिदिन कमाविणाऱ्या पॅट्रिशियाची प्रेरणादायक कहाणी !

आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे हलाखीच्या परिस्थितीतून स्वतःच्या जिद्दीने वर आले आहेत आणि आज ते अनेकांना प्रेरणा देण्याचे काम करत आहेत. अशा अनेक व्यक्तींची नावे आज जगभरात ओळखली जातात. अशाच जिद्दीने दिवसाला ५० पैसे कामवताना आज स्वतःच्या व्यवसायाला यशाच्या उंच शिखरावर नेऊ ठेवलेल्या पॅट्रिशियाची कहाणी सुद्धा प्रेरणादायी आहे. 

पॅट्रिशिया नारायण.. कन्याकुमारी येथे एका साधारण ख्रिश्चन घरात जन्म घेतलेली मुलगी जीवनाशी झगडून स्वतःचा व्यवसाय कोटींच्या घरात घेऊन जाते, ही गोष्टच अगदी स्वप्नवत वाटते. पण ही पॅट्रिशियाच्या जीवनाची सत्यकथा आहे. वयाच्या १७व्या वर्षी घरच्यांच्या संमतीविरुद्ध तिने चेन्नईत भेट झालेल्या एका महाराष्ट्रीयन मुलाशी प्रेमविवाह केला खरा.. परंतु लग्नानंतर दारू आणि ड्रग्सच्या नशेत राहणाऱ्या नवऱ्याचे अत्याचार तिला असह्य झाले. यातच तिला दोन मुलं झाली. दिवसेंदिवस व्यसनाधीन नवऱ्याचे वाढते अत्याचार सहन न झाल्यामुळे आपल्या मुलांना घेऊन तिने नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला व ती पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे राहू लागली. मुळातच स्वयंपाकाची आवड असलेल्या पॅट्रिशियाने खर्चाला हातभार लावण्यासाठी घरातच लोणची, जॅम, स्क्वाश बनवायला सुरुवात केली. हे सर्व पदार्थ तिची आई ऑफिसमध्ये घेऊन गेली आणि पाहता पाहता बनवलेला माल संपत गेला. लोकांना तिने तयार केलेली लोणची, जाम यांची चव आवडू लागली आणि पॅट्रिशियाच्या पदार्थांची मागणी वाढत गेली. एकदा तिने बनवलेला केक खाल्ल्यावर तिच्या वडिलांच्या मित्राने पॅट्रिशियाला फिरत्या कॅन्टीनची योजना सांगितली आणि ही योजनाच पॅट्रिशियाच्या जीवनात नवे वळण घेऊन आली. 

दोन अपंगांना हाताशी ठेवून २१ जून १९८२ रोजी मरीना बीचवर पॅट्रिशियाने स्वतःचे फिरते कॅन्टीन सुरू केले. अशा हातगाड्यांवर फक्त चहा-कॉफी, विड्या-सिगारेटच विकायला परवानगी होती. पण पॅट्रिशियाने थोडे धाडस करून कटलेट, समोसा, भजी, फ्रूट ज्यूस विकण्याचे ठरवले. पहिल्या दिवशी फक्त एक कप कॉफी तेवढी विकली गेली. यामुळे पॅट्रिशिया थोडी निराश झाली. घरी जाताना जेमतेम पन्नास पैसेच तिच्या पर्समध्ये जमा झाले होते. परंतु तिच्या आईने तिला धीर दिला. त्याक्षणी तिने मागे वळून पाहायचे नाही असे ठरवले. दुसऱ्याच दिवशी एकदम सहा-सातशे रुपयांचा गल्ला जमला. सगळे पदार्थ संपले. 

१९८२ ते २००३ असे तब्बल २१ र्वष ते कॅन्टीन चालले. त्या कॅन्टीनने पॅट्रिशियाला नाव दिले, रग्गड पैसा दिला. एकेका दिवसाचे उत्पन्न २५ हजारांच्या घरात जाऊ लागले. सुरुवातीला दुपारी तीन ते रात्री अकरा याच वेळेत कॅन्टीन चाले. पण मग मॉर्निग वॉकला बाहेर पडणाऱ्यांचीही मागणी येत गेली. पहाटे पाच ते सकाळी नऊ याही वेळात कॅन्टीन सुरू ठेवणे भाग पडू लागले. यावेळी पॅट्रिशिया तिथे जातीने हजर राहत असे. ग्राहकांच्या सूचना ऐकून घेत असे. 

पॅट्रिशियाची ही जिद्द बघून एकदा एका झोपडपट्टी निर्मूलन मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या कार्यालयाचे कॅन्टीन चालविण्याची, त्याच्या किचनकडे लक्ष देण्याची गळ तिला घातली. पॅट्रिशिया पहाटे पाच वाजता उठून इडल्या बनवी. बीचवर जाई. नऊ वाजेपर्यंत ती तिथे असे. नऊनंतर तिचा मुक्काम मंडळाच्या कॅन्टीनमध्ये असे. दुपारी तीनपासून ती पुन्हा बीचवर जाई ती रात्री अकरापर्यंत तिथे थांबे. एवढे सगळे वेळापत्रक साधण्यासाठी तिने कामाला, पदार्थ बनवायला माणसं ठेवली होती. तिचे मासिक उत्पन्न २५ हजारांच्या वर पोचले होते. तिचे अथक परिश्रम पाहून बँक ऑफ मदुराईने त्यांचे कॅन्टीन चालवायची तिला संधी दिली. तिथेही रोजचे तीन-एकशे जणांचे जेवण तयार करावे लागे. त्यानंतर तिच्याकडे येणाऱ्या कामांची यादी आणि तिचे उत्पन्न वाढतच गेले. नॅशनल पोर्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग स्कूल येथे कॅन्टीन चालवण्याची ऑफर तिला मिळाली. सातशे मुलांना रोजचे जेवण देण्याचे काम होते. पोर्टने राहण्यासाठी तिला घरही दिले. १९९८ पर्यंत पॅट्रिशियाने ते कॅन्टीन चालवले. तिचे आठवड्याचे उत्पन्न त्यासुमारास एक लाखाच्या घरात जाऊन पोचले होते. लाखोंच्या घरातले हे उत्पन्न तिचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले. आपण उत्तम जेवण बनवण्यास शिकवू शकतो, नवे कुक तयार करू शकतो, हा विश्वास तिला आला.

याच सुमारास तिची भेट झाली संगीथा रेस्टॉरंट ग्रुपशी. त्यांनी तिला भागीदारी देऊ केली. पण ती ऑफर तिच्या मुलाला पसंत नव्हती. आपण आपलंच हॉटेल सुरू करू शकतो, असे त्याने आईला पटवून दिले. त्या दोघांशिवाय मदतीला पॅट्रिशियाची मुलगी आणि जावई होते. सर्व सुरळीत चालू असताना पॅट्रिशियाच्या मुलीचा आणि तिच्या नवऱ्याचा मोठा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पॅट्रिशियाला याचा फार मोठा धक्का बसला. या अपघाताने ती पूर्णतः कोलमडून गेली. या धक्क्यामुळे तिचे व्यवसायावरही लक्ष उडाले. बुडत चाललेला व्यवसाय मग तिच्या मुलाने आपल्या हाती घेतला. जुन्या विश्वासातल्या माणसांना सोबत घेतले आणि कामात स्वत:ला झोकून दिले. पॅट्रिशिया सावरल्यानंतर तिने तिच्या मुलीच्या आठवणीत चेन्नई मध्ये 'प्रसन संदिपा' नावाचे हॉटेल चालू केले आणि आज या हॉटेलची चैन चेन्नईत प्रसिद्ध आहे. 

२०१० च्या जानेवारीमध्ये पॅट्रिशिया यांना ‘फिक्की’कडून ‘सर्वश्रेष्ठ महिला उद्योजक’ हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला. अवघड परिस्थितीचा सामना करत कॅटरिंग व्यवसायातील यशाद्दल हा पुरस्कार होता. त्यानंतर ‘रिडिफ डॉट कॉम’नेही पॅट्रिशियाचे प्रोफाइल आपल्या वेबसाइटवर अपलोड केले.
पॅट्रिशियाने तिचा व्यवसाय सुरू केला होता तो दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने. आज तिच्याकडे दोनशे पेक्षा जास्त जण कामाला आहेत. हातगाडी सुरू केली तेव्हा पॅट्रिशिया सायकलरिक्षाने प्रवास करायची. आज तिच्याकडे मोठमोठ्या गाड्यांचा ताफा आहे. दिवसाला पन्नास पैशांवरील तिचे निव्वळ उत्पन्न आज दिवसाला दोन लाखांच्या घरात गेले आहे. ‘फिक्की’ने दिलेला पुरस्कार ही तिच्या गेल्या ३० वर्षांच्या श्रमांची पावती ठरली आहे.